आजचा विषय आंब्याची कोय.


*आजचा विषय आंब्याची कोय*
फळांचा राजा आंबा. आंबा हा शब्द एखाद्याच्या तोंडून जरी बाहेर पडला तरी  तोंडाला पाणी सुटतेच. अशा या आंब्याचा सर्वतोपरी उपयोग होतोय. आंब्याचा वापर केल्यानंतर आपण कोय फेकून देतो. मात्र, त्या कोयीचे काय करायचे, याचा विचारसुद्धा करत नाही. तसे न करता ती कोय वापरात आणून त्याच्यापासून दंतमंजन बनवण्याचा उपयोग सुरू करून पैशांची कमाई करता येते. अशा या बहुगुणी आंब्याचा कोणताही भाग वाया जात नाही. देशामध्ये आंब्याचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. वापरलेल्या आंब्याच्या कोयींचा सध्या कुठलाच उपयोग होताना दिसत नाही. आंब्याची कोय आणि पैशांची सोय, अशी जाहिरात साधारणपणे एक तप वर्षापूर्वी आपण आकाशवाणी केंद्रावरून ऐकली असेल. तेव्हा लोकांनी आंब्याच्या कोयी पिकून काही पैसे मिळवलेही होते; परंतु या कोयीचे पुढे काय होते, हे फारच लोकांना ठाऊक आहे. आंब्याच्या कोयीचे अनेक उपयोग आहेत. आंब्याची कोय ही कृमीनाशक असून गर्भाशयाची सूज कमी करणारी रक्तप्रदर व श्वेतप्रदरावर उपयुक्त आहे.  लघवीतील जंतुसंसर्ग कमी करून मूत्रप्रवृत्ती साफ करणारी आहे. आंब्याची कोय फोडावी, स्वच्छ धुवावी आणि तिचे बारीक तुकडे करून ते वाळवावेत. कोयीचे वाळवलेले तुकडे चावून खाल्ले तर पोटदुखी, अपचन, जुलाब इत्यादी मध्ये लगेचच फरक पडतो.
पोटातील कृमींवर आंब्याच्या कोयींचे चूर्ण जालीम औषध आहे. अंडवृध्दी ही पुरुषांना भेडसावणारी समस्या आहे. यावरसुध्दा आंब्याच्या कोयीचे चूर्ण हा उत्तम उपाय आहे. मुरगळणे, लचकणे, सूज येणे या समस्येवर आंब्याच्या कोयीचे चूर्ण दाट लेप करुन लावावे. कोयीपासून उत्तम प्रकारचे दंतमंजन बनवता येते. या दंतमंजनमध्ये अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे दातांची आणि हिरड्यांची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाऊ शकते. या गुणधर्मामुळे तोंडात रोज निर्माण होणार्या  ग्राम निगेटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियांची वाढ रोखली जाते.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
*कोयाड*
उन्हाळ्यात आंब्याच्या सीझनमध्ये हा पदार्थ तयार केला जात असे. लस्सीसारख्या आंबट-गोड रसामध्ये खूप केस असलेल्या आंब्याच्या कोयी असत. मोठय़ा तसराळ्यासारख्या किंवा वाडग्यासारख्या भांडय़ात जेवताना वाढत असत. कोयी रसात बुडवून चोखून रस पिताना खूप मजा वाटत असे. पण साधारणपणे अर्धे पिकलेले केसाळ कोयीचे आंबे उकडून घेऊन आंब्याचा गर फोडणी दिलेल्या दाट आंबट-गोड ताकामध्ये बुडवलेल्या असत. जिरे, मिरेपूड, मीठ, तिखट व गूळ वापरला जाई. चव आंबट-गोड, रस दाट होतो. कोणाला अचूक कृती माहीत असल्यास ती द्यावी.
*आंब्याच्या कोयीचे दंतमजन*
बनवण्याची प्रक्रिया अशी : ताजा आंबा घेऊन जास्तीत जास्त गर काढून घ्यावा. त्याचा खाण्यासाठी किंवा इतर प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्यासाठी उपयोग करावा. गर काढल्यानंतर आंब्याची कोय पाण्याखाली व्यवस्थित घासून आणि धुवून घ्यावी. कोयीवरील तंतू काढून कोय चाकूच्या किंवा इतर साहित्याने उघडून आतील बी बाहेर काढावी. कोयीच्या आतील बी सावतील साधारणपणे एक आठवडा वाळवण्यास ठेवावी. बी पूर्णपणे वाळल्यानंतर त्याचा रंग बदलतो आणि कशावर तरी आपटल्यास त्यातून विशिष्ट आवाज येतो. वाळलेल्या बीपासून मशीनच्या साहाय्याने बारीक पावडर करावी. ती पावडर काचेच्या बरणीत भरावी. या पावडरच्या साहाय्याने दात घासावेत. काहींना टूथब्रशच्या साहाय्याने दात घासण्याची सवय असल्यास तळहातावर किंचित पाणी घेऊन त्यावर ही पावडर टाकावी आणि पेस्ट तयार करावी. हीच पेस्ट दात घासण्यासाठी टूथपेस्ट म्हणून वापरता येते.
या पावडरची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यात तेवढय़ाच प्रमाणात नीम पावडर, अल्पशा प्रमाणात बेकिंग सोडा आणि हळदीचे मिश्रण करता येते. आंब्याच्या कोयी गोळा करून त्यातील कोयीतील बी वेगळे करून नंतर त्यापासून दंतमंजन बनवण्याचा उद्योग सुरू करता येतो. हे शक्य नसल्यास दंतमंजन बनवणार्या  कंपन्याशी करार करून त्यांना आंब्याच्या कोयी किंवा त्यांच्यापासून बनवलेली पावडर पुरवता येऊ शकते. दंतमंजन बनवण्याचे आधुनिक तंत्र समजून घेऊन त्यात इतर वनस्पतींचे मिश्रण करून विशिष्ट गुणवत्ता असलेल्या दंतमंजनच्या ब्रॅण्ड विकसित करता येऊ शकते. म्हणूनच आंब्याची कोय किती महत्त्वाची आहे, यावरून समजते.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
*कोयीची सुपारी*
साहित्य. अंदाजे २ डझन आंब्यांच्या कोयी, दोन चमचे साजूक तूप, तेवढीच ज्येष्ठमध पावडर
चवीपुरते साधे मीठ व पादेलोण (काळे मीठ.)
कृती. आंबरस केल्यावर कोयी फेकून न देता चांगल्या धुऊन कडक उन्हात दोन दिवस वाळवाव्यात. नंतर एकेक कोय आडवी पकडून बत्त्याने (किंवा दगडाने) चीर पडेपर्यंत फोडून आतील बी काढावी. शक्यतो कोय फोडताना आतील बीचे तुकडे होऊ देऊ नयेत. प्रेशर कुकरमध्ये बियांच्या अंदाजाने पाणी घेऊन मूठभर साधे मीठ आणि या बिया ४-५ शिटय़ा होईपर्यंत कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. अध्र्या तासाने सर्व बियांवरील साल काढून दोन-तीन वेळा खळखळ पाण्यात चोळून धुऊन चाळणीत निथळत ठेवावेत. (खळखळ धुतल्याने कोयींचा कडवटपणा व काळे पाणी निघून जाते.) नंतर वेफर्सच्या किसणीने सर्व कोयींचे काप करून थोडे पादेलोण लावून प्लॅस्टिकच्या कागदावर एक दिवस उन्हात कडक वाळवावे. नंतर कढईत वर दिलेल्या प्रमाणात साजूक तूप घालून सर्व कोयी, तसेच पादेलोण व ज्येष्ठमध पावडरही घालावी. ५ मिनिटे मंद गॅसवर सारखे हलवावे. गॅस बंद करावा (ज्येष्ठमध पावडर व पादेलोण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त असले तरी चालते.) झाली सुपारी तयार. कैरीच्या आतील कोयींचीही अशीच सुपारी तयार करता येते.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

Comments

udayk said…
माहिती तर अतिशय नावीन्यपूर्ण आणि उपयोगी आहे,
परंतु यातील काही वैद्यकीय उपचारांच्या माहिती ला काही शास्त्रीय संदर्भ आहे काय? असल्यास तो ही इथे जोडावा. धन्यवाद.

Popular posts from this blog

आज थोर साहित्यिक व गीतकार मा.शांताराम आठवले यांची पुण्यतिथी.

आज ४ मे आज प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक मा.बाबा कदम यांची जयंती.

आज मराठीतील व हिंदीतील जेष्ठ कवी, गीतकार, चित्रपट कथालेखक गदीमा उर्फ मा.ग.दि.माडगूळकर यांची जयंती.